महाराष्ट्र

डिअर अहो, बाय…

एका 26 वर्षीय विवाहित डॉक्टर तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना छत्रपती संभाजी नगर शहरातील बजरंग चौक परिसरात समोर आली आहे. लग्नानंतर अवघ्या चार महिन्यातच पतीच्या त्रासाला कंटाळून या डॉक्टर पत्नीने गळफास घेतला. प्रतिक्षा प्रीतम गवारे असे या विवाहितेचे नाव आहे. पती प्रीतम हा वारंवार चरित्रावर संशय घेत होता. माहेरून हुंड्याचे पैसे आणि फर्निचरसाठी पैसे आणण्याचा तगादा लावत होता. त्यामुळे कंटाळलेल्या डॉक्टर पत्नीने टोकाचे पाऊल उचलले.
महत्त्वाचे म्हणजे मृत्यूपूर्वी पतीला फोन करून घरी बोलावले. मात्र तो येण्यापूर्वीच तिने गळफास घेतलेला होता. याप्रकरणी प्रतिक्षाच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पतीविरोधात सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी प्रतिक्षाने सात पानी चिठ्ठी लिहून आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.
आत्महत्येपूर्वी प्रतिक्षाने चिठ्ठीत नेमके काय म्हटले?- डिअर अहो, खूप प्रेम केले हो तुमच्यावर. जिवापाड केले. स्वत:ला विसरुन गेले तुमच्यासाठी. माझ्यासारख्या हसत्याखेळत्या मुलीला त्रास देऊन मंद करून टाकले तुम्ही, एका स्वावलंबी मुलीला dpen‌dent बनवले. खूप स्वप्न घेऊन लग्न केले होते तुमच्याशी. हे मला खूप जीव लावतील, काळजी करतील, करिअरमध्ये सपोर्ट करतील, आपली छोटीशी फॅमिली असेल. तुम्हाला मुलगा लागत होता ना त्याचीच तयारी करत होते मी.
मी गेल्यावर तुम्हाला नवीन सुंदर हुंडा देणारी बायको भेटेल, माझी कदर केली नाही Atlist दुसऱ्या बायकोची करा आणि सुखी राहा. मला जाब विचारला जातो, माझ्यावर नजर ठेवायला मित्रांना कॉल केला जातो. नोकरीच्या ठिकाणीही तुमचा धाक असतो. शेवटी एवढंच म्हणेल, माझ्या आईवडिलांना मी नसले तरी कुणाल आहे. पण तुम्ही एकटे आहात. सासू, सासऱ्यांना नीट सांभाळा. त्यांच्यावर चिडचिड  करत जाऊ नका. आय लव्हू यू सो मच. बाय. यू आर अ फ्री बर्ड नाऊ.

Related Articles

Back to top button