महाराष्ट्र

महिला, मुलींची छेड काढताना आढळल्यास थेट धिंड काढा

राज्यात दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. अलीकडेच बदलापूरमध्ये दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली होती. दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर महिला व मुलींच्या सुरक्षेबाबत सातारा जिल्हा प्रशासन आता ॲक्शन मोडवर आले आहे. महिला आणि मुलींची सातत्याने  छेड काढताना तिसऱ्यांदा आढळल्यास पोलिसांनी संबंधितांची शहरातून धिंड काढावी, अशी सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.
बदलापूर आणि कोलकाता येथील घटनेनंतर सातारा जिल्ह्यातही महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी कठोर पावले जिल्हा प्रशासनाने कडक उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे, याची माहिती देसाई यांनी पत्रकारांना दिली. जिल्ह्यातील महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी कडक उपाययोजना केल्या जात असून सर्व बस, रिक्षा, वडापमध्ये क्यूआर कोड बसविण्यात येणार आहेत. प्रवासादरम्यान कोणी छेडछाड करत असल्यास महिलांनी क्युआर कोड स्कॅन करावा. त्यामुळे पोलिसांना अलर्ट जाईल आणि संबंधितांवर कारवाई होईल, असे देसाई यांनी सांगितले.
प्रत्येक प्राथमिक शाळा आणि महाविद्यालयातील मुलींसाठींच्या स्वच्छतागृहात जाण्यासाठी जाण्याच्या एंट्री पॉईंटमध्ये बदल केला जाणार आहे. तसेच महिला कर्मचाऱ्यांकडूनच स्वच्छतागृहांची सफाई करण्यात यावी, अशी सक्त सूचना दिली आहे. तसेच या कामासाठी रोजंदारीवर घेतलेल्या कर्मचाऱ्यांचे पोलिस व्हेरिफिकेशन केले जाणार आहे. येत्या आठ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना प्रशासनाला केल्याचे देसाई यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button