सोलापूर
ब्रेकिंग! शनिवारी सोलापूर बंदची हाक

- बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ सोलापूर शहरातील महाविकास आघाडीच्यावतीने शनिवार 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंद अंतर्गत सोलापुरातही बंद पुकारण्यात आला आहे, अशी माहिती माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील आदर्श विद्या मंदिरात शिकणार्या बालिकेवर शाळेतील एका नराधम कर्मचार्याने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली. या निषेधार्थ महाविकास आघाडीच्यावतीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्यामध्ये सोलापूर बंद ठेवण्यात येणार आहे. सोलापुरात महाविकास आघाडीअंतर्गत असलेले काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट आणि माकप या पक्षांच्यावतीने हा बंद पुकारण्यात आला आहे. या प्रकरणातील नराधमास फाशीची शिक्षा द्यावी. लाठीचार्जप्रकरणी कारवाई करावी, यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.
शनिवारी सोलापूर बंदमुळे अत्यावश्यक सेवा, दूध, वर्तमानपत्र विक्री, आरोग्य सुविधा सोडून इतर सर्व व्यापार आणि व्यवसाय बंद ठेवण्यात येणार आहेत. रिक्षा सेवाही बंद राहणार आहे. या बंदमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.
शनिवारी सकाळी 10 वाजता सोलापूर शहरातील पूर्व भागातील दत्तनगर आणि महापालिका शाळा क्रमांक एक, दत्त चौक येथून या बंदसाठी आवाहन करत शांततेत मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यानंतर हे दोन्ही मोर्चे सकाळी 11.30 वाजता जिल्हा परिषदेसमोरील पूनम गेट येथे आल्यानंतर सभेत रूपांतर होईल.