प्रेमात धोका ! ऐश्वर्याला बसला मानसिक धक्का

राज्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. लातूरच्या एका 24 वर्षीय तरूणीने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. प्रियकराने लग्नास नकार दिल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलले. घरात कमावती लेक अचानक अशी गेल्याने तिच्या घरच्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
ऐश्वर्या चव्हाण असे या तरूणीचे नाव आहे. ती पेशाने नर्स होती. ती लातूरमधल्या एका दवाखान्यात नर्स म्हणून काम करत होती. दरम्यान लॅब टेक्निशियन असलेल्या अविष्कार माने या तरूणाबरोबर तिची ओळख झाली. त्यांच्यात चांगली मैत्रीही झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघांनीही लग्न करण्याचेही ठरवले होते. गेल्या काही महिने त्या दोघांमध्ये सर्व काही ठीक चालले होते.
लग्न करणार आहे असे सांगून अविष्कारने तिला फसवले, असा आरोप तिच्या कुटुंबीयानी केला आहे. लग्न करावे यासाठी तिने तगादा लावला होता. पण तो वारंवार लग्नाचा विषय काढला की बोलणे टाळत होता. अखेर त्याने लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे ऐश्वर्याला मानसिक धक्का बसला. हा नकार तिला सहन झाला नाही. नैराश्यातून तिने राहात्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. आता संबंधित तरुणाच्या विरोधात लातूरच्या एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.