क्राईम
लग्नात ओळख, प्रेमाचा बनाव आणि…

- राज्यामधून धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमाच्या जाळ्यात अडकवून युवकाने कारमध्ये 15 वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अत्याचारसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तरुणाला अटक केली आहे. सुमित ऊर्फ साहिल मनोहर चंदेल असे आरोपी युवकाचे नाव आहे. ही घटना नागपूरमध्ये घडली आहे.
- समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी सुमित हा वाहनचालक आहे. तर पीडित मुलगी दहावीत शिकते. एप्रिल महिन्यात एका लग्नात मुलीची सुमितसोबत ओळख झाली होती. तेव्हा दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी सुमितने इस्टाग्रामवर मुलीला मेसेज पाठविला. यातून त्यांच्यात ओळख होऊन तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले.
- २१ जून रोजी पीडित अल्पवयीन मुलगी सुमितसोबत मोबाईलवर बोलत असताना नातेवाईकांनी पाहिले. तेव्हा नातेवाईक तिला रागावले. त्यानंतर दुपारी सुमितने तिच्याशी संपर्क साधून तिला गड्डीगोदाम चौकात भेटायला बोलाविले. मुलगी तेथे आल्यानंतर सुमित तिला कारने बेलतरोडीतील निर्जनस्थळी घेऊन गेला. तिथे तिच्यावर अत्याचार केला. अत्याचारानंतर मुलीने कशीबशी तेथून सुटका करून ती मनीषनगर परिसरात आली.
- दरम्यान, पीडित मुलीने तेथील एका युवकाच्या मोबाइलवरुन नातेवाईकांशी संपर्क साधला. त्यानंतर नातेवाईक तेथे गेले आणि तिला घरी घेऊन आले. घरी आल्यानंतर मुलीने पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी सुमितला अटक केली आहे.



