महाराष्ट्र
युवकाचा खून

- सहकाऱ्यास ऑटोत बसविण्याच्या कारणावरून २६ वर्षीय युवकास चाकूने वार करून जीवे मारल्याची घटना परभणी जिल्ह्यातील चारठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निरवाडी (बु) येथे रात्री घडली. याप्रकरणी मुख्य आरोपीसह त्याची आई, वडील आदी तीन जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पिंपरी (खुर्द) येथील गजानन यादव गिते हा त्याच्या सहकाऱ्यास निरवाडी (बु) गावात जाण्यासाठी ऑटोत बसवून देण्याच्या कारणाने मुख्य आरोपी ऑटोचालक अमोल काळे याच्यासोबत वाद झाला. याच कारणावरून चालक अमोलने गितेच्या पोटात शस्त्राने वार केले.
या घटनेची माहिती गितेने त्याच्या नातेवाइकांना दिली. त्याचे नातेवाईक निरवाडीत दाखल होताच त्यांनी जखमी गितेला चारठाणा आरोग्य केंद्रात नेले. तेथे प्रथमोपचार करून पुढील उपचारास परभणीच्या खासगी रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, तेथे डॉक्टरांनी तपासून गजानन गिते यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. मयताचा चुलत भाऊ एकनाथ याच्या फिर्यादीवरून अमोल, त्याचे वडील गणेश काळे, आई मथुराबाई काळे या तिघांविरुद्ध चारठाणा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.