राजकीय

ठाकरे गट पुन्हा अडचणीत

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटाचे १६ आमदार पात्र की अपात्र, याबाबत शुक्रवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार होती. मात्र, आता ही सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. परिणामी ठाकरे गटाचे टेन्शन वाढले आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे शिंदे गट आमदार अपात्र प्रकरणात वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करत ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी ही याचिका दाखल केली होती. कोर्टाने या याचिकेवर सुनावणी घेताना नार्वेकर यांना फटकारले होते.
दरम्यान नार्वेकर यांनी दोन आठवड्यात शिंदे गट आमदार अपात्र प्रकरणाच्या सुनावणीचा रोडमॅप सादर करण्याच्या सूचना सुप्रीम कोर्टाने दिल्या होत्या. यावर शुक्रवारी ६ ऑक्टोबरला सुनावणी घेतली जाईल, असे कोर्टाकडून सांगण्यात आले होते. त्यानुसार नार्वेकर यांनी आमदारांची एक सुनावणी घेत पुढील वेळापत्रकही तयार केले होते.
शुक्रवारच्या सुनावणीवेळी नार्वेकर हे आमदार अपात्र प्रकरणाच्या सुनावणीचा रोडमॅप सादर करणार होते. मात्र, आता कोर्टाने ही सुनावणी पुढे ढकलली असल्याची माहिती आहे. प्रकरण लिस्टेड न झाल्याने ही सुनावणी ९ ऑक्टोबर रोजी होणार आहे. दरम्यान, आमदार अपात्रतेची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडल्याने ठाकरे गटाचे टेन्शन वाढले आहे.

Related Articles

Back to top button