महाविकास आघाडीचा महामोर्चा म्हणून मराठा क्रांती मोर्चाचा व्हिडिओ वापरला
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट केलेल्या व्हिडिओमुळे वाद निर्माण झाला आहे. मराठा क्रांती मोर्चाचा व्हिडिओ महाविकास आघाडीचा मोर्चा म्हणून शेअर केल्याप्रकरणी राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मराठा क्रांती मोर्चा आज शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहे.
राज्यपाल आणि भाजप नेत्यांनी महापुरुषांबाबत केलेल्या अपमानास्पद वक्तव्याविरोधात महाविकास आघाडीने मुंबईत मोर्चा काढला होता. या मोर्चाला तुरळक प्रतिसाद मिळाला असल्याचा दावा भाजप आणि शिंदे गटाकडून करण्यात आला होता.
सत्ताधा-यांच्या टीकेला उत्तर देताना महाविकास आघाडीने काही व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले होते. राऊत यांनी ट्वीट केलेला व्हिडिओ हा मराठा क्रांती मोर्चाचा असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर राऊत यांच्यावर टीकेची झोड उठवण्यास सुरुवात झाली. राज्यसभेचे माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी देखील राऊत यांच्यावर याच मुद्द्यावरून टीका केली होती.