गेल्या पाच दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला आता पोलिसांचा आडकाठीचा फतवा मिळाला आहे. नियमभंग आणि न्यायालयीन निर्देशांचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांच्या कोअर कमिटीला नोटीस बजावली आहे. तसेच मैदान तातडीने रिकामे करण्याचा आदेश दिला आहे.
जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचे आंदोलन सध्या आझाद मैदानावर सुरू आहे. परंतु, पोलिसांच्या नोटीसमुळे या आंदोलनाची दिशा बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. न्यायालयीन आदेशानुसार आंदोलनाच्या परवानगीसाठी ठरवलेल्या अटी-शर्तींचे पालन न झाल्याने मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे हे आंदोलन आता कायदेशीर अडचणीत सापडले आहे.
दरम्यान, जरांगे यांनी आपली ठाम भूमिका पुन्हा स्पष्ट करताना म्हटले होले की, फडणवीस यांनी गोळ्या घातल्या तरी आम्ही आरक्षणाशिवाय जाणार नाही. या आक्रमक भूमिकेमुळे आंदोलकांचा उत्साह वाढला होता. पण आता पोलिसांची नोटीस आल्यानंतर वातावरण आणखी तापण्याची चिन्हे आहेत.
पोलिसांच्या कारवाईनंतर जरांगे आणि त्यांच्या समर्थकांचा पुढे काय निर्णय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या प्रकरणावर आज पुन्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे. जरांगे यांच्या आंदोलनावर आणि सरकारच्या पुढील भूमिकेवर कोर्टाचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.