महाराष्ट्र

ब्रेकिंग! आझाद मैदानावर तुफान गोंधळ, सुप्रिया सुळे यांची गाडी अडवली, घेराव घातला

  • मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावे, यासह विविध मागण्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील हे मुंबईतील आझाद मैदानात गेल्या तीन दिवसांपासून बेमुदत उपोषणाला बसले आहेत. विरोधी पक्षातील खासदार आणि आमदार हे जरांगे यांची भेट घेताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील आज जरांगे यांची भेट घेतली. तसेच मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय बैठक आणि एक दिवसाचे अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे. 
  • मात्र, त्यानंतर सुळे जात असतानाच मराठा आंदोलकांनी त्यांची गाडी अडवली आणि बॉटल भिरवल्याचे पाहायला मिळाले. जरांगे यांची भेट घेतल्यानंतर सुळे आझाद मैदानावरून आपल्या कारकडे जात होत्या. यावेळी मराठा आंदोलकांनी त्यांना घेराव घालत एक मराठा-लाख मराठा अशी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. 
  • यावेळी काही आंदोलकांनी शरद पवार यांच्याविरोधात देखील घोषणाबाजी केली. पवारांनीच मराठ्यांचे वाटोळं केले, अशी घोषणाबाजी आंदोलकांनी केली. यावेळी काही मराठा आंदोलकांनी सुळे यांना वाट काढून दिली आणि त्यांना कारपर्यंत पोहोचवले. मराठा आंदोलक आक्रमक झालेले असताना सुळे मात्र शांत होत्या. त्यांनी प्रत्येक आंदोलकाला हसतमुखाने नमस्कार केला आणि प्रत्येकाला हस्तांदोलन केले. सर्वांनाच नमस्कार करून त्या कारमधून निघून गेल्या. मात्र काही आंदोलकांनी त्यांची कार अडवली आणि घोषणाबाजी केली. 
  • यावेळी पुन्हा एकदा काही आंदोलकांनी पुढे येत सुळे यांच्या कारला जागा करून दिली. सुळे यांची कार पुढे निघून गेल्यावर काही आंदोलकांनी कारचाही पाठलाग केला. तसेच त्यांच्या कारवर बॉटल देखील भिरवली. या सर्व घडामोडीमुळे काही काळासाठी आझाद मैदान परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

Related Articles

Back to top button