महायुती सरकारची लाडकी बहीण योजना ही एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्यात येतात. मात्र, या योजनेच्या निकषात न बसताही अनेकांनी आर्थिक लाभ घेतल्याचे वृत्त समोर आलं आहे. त्यानंतर सरकारकडून छाननी करण्यात आली आणि अपात्र महिलांचा लाभ थांबवण्यात आला आहे. राज्यातील लाखो महिलांचा लाभ थांबवण्यात आल्यानंतर या महिला यादीतून आपले नाव वगळले की नाही हे तपासून पाहत आहेत.
दरम्यान या योजनेची वेबसाईट आणि लिंक असल्याचा एक मेसेज सोशल मीडियात व्हायरल होत आहे किंवा लिंक सुद्धा शेअर केल्या जात आहेत. या लिंकवर क्लिक करुन तुम्ही आपले नाव लाडकी बहीण योजनेतून वगळले आहे की नाही हे तपासू शकता, असे सांगण्यात येत आहे. मात्र, ही वेबसाईट सायबर गुन्हेगारांकडून तयार करण्यात आली आहे.
सर्वसामान्य महिलांचा गैरफायदा घेत सायबर गुन्हेगारांकडून लाडकी बहीण योजनेची बनावट वेबसाईट आणि लिंक व्हायरल केली जात आहे. या वेबसाईटवर किंवा लिंकवर तुम्ही क्लिक केल्यास तुम्हाला आधार क्रमांक अपडेट करावा लागतो. तसेच तुमची इतरही वैयक्तिक माहिती शेअर करावी लागते. मात्र, तुमच्या या माहितीचा गैरवापर केला जाऊ शकतो. इतकेच नाही तर तुमच्या बँक खात्यातून रक्कम सायबर गुन्हेगार आपल्या खात्यात वळती करु शकतात. त्यामुळे अशा लिंक किंवा बनावट वेबसाईटपासून सावध राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.