महाराष्ट्र
रेव्ह पार्टी प्रकरणी नवऱ्याला अटक

- पुण्यात उघडकीस आलेल्या रेव्ह पार्टी प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांचे नाव समोर आले. त्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. याच पार्श्वभूमीवर रोहिणी खडसे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक सूचक पोस्ट शेअर करत आपली भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.
- खडसे यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये त्या आपल्या पती प्रांजल यांच्यासोबत एका मंदिराबाहेर उभ्या आहेत. या फोटोसह त्यांनी एक कॅप्शन लिहिले आहे, कायद्यावर अन् पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे. प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असते. योग्य वेळी सत्य बाहेर येईल. या वाक्यातून त्यांनी सध्याच्या चर्चांवर अप्रत्यक्षपणे भाष्य केले आहे, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
- दरम्यान पुण्यात झालेल्या एका गुप्त रेव्ह पार्टीचे आयोजन प्रांजल यांनीच केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही हॉटेल बुकिंगच्या पावत्यांवर त्यांच्या नावाचा स्पष्ट उल्लेख आहे. विशेष म्हणजे, या पार्टीतील दोन रूम्स प्रांजल यांच्या नावावर बुक करण्यात आल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणात त्यांचा थेट सहभाग होता का, याबाबत चौकशीची मागणी होत आहे.



