- शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड पुन्हा चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांची चर्चा वेगळ्या कारणाने होत आहे. शिळे आणि निकृष्ट दर्जाचे जेवण दिले म्हणून गायकवाड यांचा संताप अनावर झाला. त्यांनी आमदार निवासातील कॅन्टिनमध्ये राडा घातल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी त्यांनी कॅन्टिनच्या व्यवस्थापकालाही सुनावले. तसेच येथील एका कर्मचाऱ्याला त्यांनी बेदम मारहाण केल्याचेही समोर आले आहे. आमदार गायकवाड यांनी बनियन अन् टॉवेलवरच येत कॅन्टिनमध्ये जोरदार राडा घातला.
- आमदार गायकवाड यांनी काल आमदार निवासातील कॅन्टिनमध्ये जेवणाची ऑर्डर दिली होती. त्यांना जेवण देण्यात आले. परंतु, त्यांच्या ताटातील भात आणि वरण शिळे होते. त्याचा वास येत होता, असा आरोप आमदार गायकवाड यांनी केला. या प्रकाराने त्यांचा संताप अनावर झाला. त्यांनी थेट कॅन्टिनच्या व्यवस्थापकालाच फैलावर घेतले. याआधी देखील मी कॅन्टिनमधील जेवणाची दोन ते तीन वेळा तक्रार दिली होती. आज मी हा मुद्दा सभागृहात मांडणार असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले.
- पावसाळी अधिवेशनासाठी गायकवाड सध्या मुंबईत आहेत. आकाशवाणी आमदार निवासात त्यांची राहण्याची व्यवस्था केली होती. येथील कॅन्टिनमध्ये त्यांना खराब जेवण मिळाल्याचे कारण पुढे करत त्यांनी जोरदार राडा घातला.
- गायकवाड यांनी कॅन्टिनच्या कर्मचाऱ्याला थेट बुक्क्यांनी मारहाण केली. कर्मचाऱ्याला कानशिलात लगावली आणि ठोसे मारले. यानंतर त्यांनी कॅन्टिन चालकालाही लक्ष्य केले. या सगळ्या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
शिळ्या जेवणाचा राग!
