खुशखबर; राज्यात ऑक्टोबरमध्ये होणार दहा हजार पोलिसांची भरती

Admin
2 Min Read

राज्यातील २०२४ आणि डिसेंबर २०२५ पर्यंतच्या पोलिस अंमलदारांच्या रिक्त पदांची माहिती गृह विभागाच्या प्रशिक्षण व खास पथकाच्या अपर पोलिस महासंचालक कार्यालयाने संकलित केली आहे. आता ऑक्टोबरमध्ये भरतीला सुरुवात होणार असून पदभरतीच्या मान्यतेसाठी गृहविभागाला प्रस्ताव सादर केला आहे. सुरुवातीला मैदानी आणि त्यानंतर मुंबई वगळता राज्यभरात एकाचवेळी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.

राज्याची वाढती लोकसंख्या, शहरांचा होणार विस्तार, गुन्ह्यांचे वाढत चाललेले प्रमाण या पार्श्वभूमीवर अनेक पोलिस अधीक्षक, पोलिस आयुक्तांनी नव्या पोलिस ठाण्यांचे प्रस्ताव गृह विभागाकडे सादर केले. मात्र, अजूनही त्यासंदर्भातील निर्णय झालेला नाही. दुसरीकडे सण-उत्सव, आरक्षणासह विविध मुद्द्यांवरून होणाऱ्या आंदोलनांमध्ये देखील वाढ झाली. या पार्श्वभूमीवर हेड कॉन्स्टेबल व अधिकाऱ्यांना गुन्ह्यांचा तपास वेळेत करण्यास अडचणी येत आहेत. सण-उत्सव, मंत्र्यांचे दौरे आणि कमी मनुष्यबळात अनेक गुन्ह्यांच्या तपासाची जबाबदारी, यामुळे अंमलदारांना आठ तासांऐवजी १० ते १२ तासांची ड्यूटी करावी लागते. 

या पार्श्वभूमीवर ऑक्टोबरमध्ये पोलिस भरतीचे नियोजन असल्याचे प्रशिक्षण व खास पथके कार्यालयातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या पोलिस भरतीत बँड्‌समन, चालक शिपाई, पोलिस शिपाई, राज्य राखीव पोलिस बलातील अंमलदार देखील असणार आहेत.

दरवर्षी सरासरी पाच टक्के पोलिस अंमलदार सेवानिवृत्त होतात. याशिवाय स्वेच्छानिवृत्त, काहींचा अपघाती मृत्यू देखील होतो. त्यामुळे जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२५ पर्यंत राज्यात पोलिसांची सुमारे दहा हजार पदे रिक्त होतात. या पार्श्वभूमीवर आगामी भरतीत उमेदवारांना एका पदासाठी एकाच जिल्ह्यात एकच अर्ज करता येणार आहे.

Share This Article