क्राईम

मित्राकडून घात, अंघोळ करताना व्हिडीओ केले शूट

  • राज्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत गंभीर घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेच्या ओळखीचा एका व्यक्ती तब्बल तीन वर्षांपासून ब्लॅकमेल करत होता. नराधमाने ब्लॅकमेल करत तिच्यावर सातत्याने लैंगिक अत्याचार केला. इतक्यावर न थांबता पीडित महिलेकडून लाखो रुपये देखील उकळले.
  • याप्रकरणी अकबर गांची या आरोपीविरोधात मुंबईतील मालाड पोलिसांनी सबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालाड येथे राहणाऱ्या ३५ वर्षीय पीडित महिलेची काही वर्षांपूर्वी आरोपी अकबरसोबत मैत्री झाली होती. ही मैत्रीच तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरली. सुमारे तीन वर्षांपूर्वी अकबरने पीडित महिलेचे अंघोळ करतानाचे काही अश्लील व्हिडीओ मोबाईलमध्ये गुप्तपणे शूट केले. याच व्हिडीओंना आधार बनवून त्याने पीडितेला धमकावणे आणि तिचे लैंगिक शोषण करणे सुरू केले.
  • गेल्या तीन वर्षांत आरोपी अकबरने पीडित महिलेकडून दीड लाख रुपये रोख आणि तब्बल आठ तोळे सोन्याचे दागिने जबरदस्तीने घेतले. तरीही त्याच्या वासनेला आणि लालसेला अंत नव्हता. तो सतत पीडितेला आणखी पैशांसाठी आणि लैंगिक शोषणासाठी ब्लॅकमेल करत होता.
  • अखेर आरोपीच्या या अमानुष अत्याचाराला कंटाळून पीडितेने धाडस दाखवत मालाड पोलीस ठाणे गाठले. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्वरीत पाऊले उचलली. आरोपी अकबर विरोधात ब्लॅकमेलिंग, खंडणी आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.

Related Articles

Back to top button