- राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी मोठा ड्रामा पाहायला मिळाला आहे. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांना एक दिवसासाठी निलंबित करण्यात आले आहे. भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी केलेल्या विधानावरुन मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी, अशी मागणी विरोधकांनी केली. यावरुनच वाद झाल्यानंतर पटोले अध्यक्षांच्या आसनाकडे गेले. त्यावेळी जोरदार घोषणाबाजीही केली. यानंतर सभागृहाचे कामकाज तहकूब करत पटोलेंचे दिवसभरासाठी निलंबन करण्यात आले आहे.
- लोणीकर यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या विधानावरुन विधानसभेत राडा झाला. शेतकऱ्यांचा अपमान केल्याप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी माफी मागावी, अशी मागणी विरोधकांनी केली. शेतकऱ्यांचा बाप मोदी नाही, तुमचा बाप असेल, असे म्हणत पटोले आक्रमक झाले. यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोरील राजदंडाला हात लावला आणि जोरदार घोषणाबाजी केली. तितक्यात नार्वेकर यांनी विधानसभा तहकूब केली.
- पटोले यांना अध्यक्ष असताना या सभागृहात राजदंडाला स्पर्श केल्यास काय कारवाई करावी यासंदर्भातील रुलिंग देण्यात आले होते. त्यामुळे नानाभाऊ मला तुम्ही पुढची कारवाई करण्यासाठी मजबूर करू नका. जागेवर बसा अथवा कामकाज सुरू ठेवण्यासाठी मला पुढची कारवाई करावी लागेल. अध्यक्ष बोलायला उभ राहीले असताना असे वागणे तुम्हाला शोभत असेल तर मला पुढे काही म्हणायचे नाही, असे म्हणत पटोलेंचे एका दिवसासाठी निलंबन करत असल्याचे नार्वेकर यांनी जाहीर केले.
ब्रेकिंग! विधानसभेच्या सभागृहात हायहोल्टेज ड्रामा
