- राज्यात अलीकडे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूरसह अन्य भागात वाहतुकीचे नियम कडक करण्यात आले आहेत. तरीही काहीजण नियम न पाळता वाहन चालवतात. दरम्यान, एका महिला ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ट्रिपल सीट जाणाऱ्या मुलींचा पाठलाग करून या ट्रॅफिक पोलिस महिलेने या मुलींना शिव्या घालत फटकेही दिले. लातूर शहरातील जुना रेणापूर नाका भागात तीन मुली एकाच स्कुटीवर बसून भरधाव वेगात जात होत्या. महिला पोलिसाने हात दाखवला तरी त्या थांबल्या नाहीत.
- मग काय पोलिस महिलेने मुलींचा पाठलाग करून त्यांना पकडले. मुलींना पकडल्यानंतर महिला कर्मचाऱ्याने संतापाच्या भरात मुलांना अक्षरश: शिव्यांची लाखोली वाहिली. ऐ झिपरे, जीव उदार झाला आहे का तुला? तु मरशील अन् आणखी दोघांना घेऊन मरशील. तुझ्या बापाला फोन लाव. बेवारशी आहेस का? अशा भाषेत मुलींना जाब विचारला. घाबरलेल्या मुली चूक झाली, माफ करा म्हणत होत्या, यापुढे असे करणार नाही, असे सांगत होत्या. मात्र, महिला पोलीस कर्मचारी काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या.
- मलाही दोन मुली आहेत, तुम्हाला वाकडं बसायची काय गरज होती? असे म्हणत ट्रॅफिक पोलिस महिलेने मुलींच्या कानाखालीही लगावल्याचेही या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
- या मुली अल्पवयीन असल्याचे सांगण्यात येत असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. एकीकडे मुलींच्या बेजबाबदारपणावरुन टीका होत असतानाच महिला पोलीस कर्मचाऱ्याने मुलींना अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याने, सर्वांमोर अपशब्द वापरल्याने नेटकऱ्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. अशी भाषा वापरणे योग्य नसल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले आहे.
ऐ झिपरे, तुझ्या बापाला फोन लाव!
