महाराष्ट्र
आजी आजोबांना मदत केली, डोळे पाणावले!

- पहिल्या दुकानात गेले तेव्हा भिकारी समजून हातात एक रुपया टेकवला आणि बाहेर काढलं…जवळ १३०० रुपये आणखी ३ दुकानं फिरले….९३ वर्षांचे आजोबा बायकोसाठी दागिना आणि मंगळसूत्राच्या वाट्या खरेदी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या औरंगपुरा रस्त्यावर फिरत होते. जेव्हा ते पहिल्या दुकानात शिरले तेव्हा त्यांना भिकारी समजून दुकानदाराने हातात एक रुपया टेकवून तिथून हाकलून लावले. नंतर दोन दुकानात आजीला काहीच न आवडल्याने ते तसेच माघारी फिरले. पुढे गोपिका ज्वेलर्सच्या दुकानात दागिने बघत असताना निलेश खिंवसरा यांनी आजोबांना २५०० रुपये किंमतीची माळ आणि मंगळसूत्राच्या वाट्या अवघ्या २० रुपयांत दिल्या. आजोबा आजीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
- आजोबांना आजीसाठी काहीतरी घ्यायचं होतं, ते ठरलं आणि आजोबांनी जवळचे पैसे देऊ केले. तेव्हा त्यांच्याकडच्या त्या नोटा, चिल्लर पाहून निलेश यांना त्यांच्याबद्दल आपुलकी निर्माण झाली. दुकानात एक ग्राहकांचा रिव्ह्यूव शूट करत असतानाच हे संभाषण व्हिडीओ शूट करणाऱ्याच्या कानी पडलं. आजीवर आजोबांचं असलेलं प्रेम पाहून निलेश यांनी त्यांच्याबद्दल जाणून घेतलं तेव्हा त्यांना कळलं की, आजोबांचा एक मुलगा काही दिवसांपूर्वीच वारला. त्यांचा दुसरा मुलगा व्यसनी असल्याने आजोबांनी आज्जीसह घर सोडलं. जवळच कुठेतरी हे आजी आजोबा राहतात असं आजोबांनी निलेश यांना सांगितलं. हे सांगताना मात्र आजोबा आणि आज्जीच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. ते दोघेही राडवेले झालेले पाहून निलेश यांनी त्यांना पुन्हा हसवण्याचा प्रयत्न केला.
- पांडुरंग आणि रुख्मिणी भेटली तुमचा आशीर्वाद मला मिळेल असे म्हणत निलेश यांनी दोघांकडून १० रुपयांच्या नोटा घेतल्या. असं प्रेम याआधी मी कधीच पाहिलं नव्हतं अशी प्रतिक्रिया निलेशजी देतात. त्याचमुळे आजी आजोबांचं जेवढं कौतुक होतंय तेवढंच कौतुक निलेश यांनी केलेल्या कामाचंही होत आहे.



