ब्रेकिंग! अहमदाबादमध्ये मोठा विमान अपघात

अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळल्याचे वृत्त समोर आले असून, यात नेमके किती प्रवासी प्रवास करत होते, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नसून प्लेन क्रॅश झाल्यानंतर घटनास्थळी धुराचे मोठे लोट दिसून येत आहेत. सध्या घटनास्थळी मदत कार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून अनेकांचा यात मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अहमदाबाद येथील मेघानी जवळ हा अपघात झाला असून हे विमान अहमदाबादहून लंडनकडे निघाले होते. ज्यात 242 प्रवासी प्रवास करत होते.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एअर इंडियाचे हे विमान लंडनकडे प्रस्थान करत होते. त्याचवेळी टेकऑफ करत असताना या विमानाचा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. घटनेवेळी विमानात 242 प्रवासी प्रवास करत असल्याचे सांगितले जात आहे. ज्या ठिकाणी हे विमान क्रॅश झाले तो सर्व परिसर नागरी वस्तीचा असून, शेजारीच सरकारी रूग्णालय असल्याचेही सांगितले जात आहे. अपघातानंतर विमानतळाचा परिसर पूर्णपणे रिकामा करण्यात आला असून प्लेन क्रॅश झाल्यानंतर जखमींना तातडीने जवळील सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून यात अनेक जण गंभीर जखमी झाल्याचे सांगितले जात आहे.
एअर इंडियाचे 171 हे विमान अहमदाबादहून लंडनकडे निघाले होते. या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणीदेखील प्रवास करत असल्याचे सांगितले जात आहे. याबाबात अद्याप अधिकाऱ्यांकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मात्र, रूपाणी या विमानात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या भीषण अपघातानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी फोनवरून चर्चा करत त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.



