मनोरंजन

नव्या सिनेमाची स्क्रिप्ट ऐकवली अन् वाटेतच मृत्यूने गाठले

साऊथ सिनेसृष्टीतून आज एक अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध तमिळ दिग्दर्शक विक्रम सुगुमारन यांचे आज वयाच्या 48 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मदुरईहून चेन्नईला प्रवास करत असताना बसमध्येच त्यांना मृत्यूने गाठले, ज्यामुळे सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या अचानक निधनामुळे साऊथ सिनेसृष्टीतील कलाकार आणि चाहते शोक व्यक्त करत आहेत. विक्रम हे त्यांच्या अभिनव कामासाठी ओळखले जात होते.

विक्रम हे एका निर्मात्याला नवीन स्क्रिप्ट ऐकवण्यासाठी मदुरईला गेले होते. मदुरईहून चेन्नईला बसने परतत असताना त्यांच्या छातीत तीव्र दुखू लागले. त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त मिळाल्यानंतर अनेकांनी समाजमाध्यमांवर त्यांना श्रद्धांजली वाहिली.

विक्रम यांनी १९९९ साली सहायक दिग्दर्शक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. अनेक मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये त्यांनी सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले होते, ज्यामुळे त्यांना चित्रपट निर्मितीच्या विविध पैलूंचा अनुभव मिळाला. ‘मधा यानाई कूटम’ या चित्रपटातून त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले, ज्याला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यांच्या कामातून त्यांनी स्वतःची एक वेगळी शैली निर्माण केली होती.

विक्रम यांच्या पाठीमागे त्यांची पत्नी आणि मुले असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Related Articles

Back to top button