छेडछाड आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून तरुणीची आत्महत्या

एका तरुणीने छेडछाड आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून आत्महत्या केली. या घटनेला 14 एप्रिल रोजी एक महिना पूर्ण झाला तरी देखील पीडित कुटुंब न्यायाच्या प्रतिक्षेत आहे. तर तरुणीच्या आईने थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहून भाचीला न्याय देण्याची मागणी केली आहे.
बीड जिल्ह्यातील केएसके महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तरुणीने 14 मार्च रोजी धाराशिव येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेला नुकताच एक महिना पूर्ण झाला. मात्र पीडित कुटुंब अजूनही न्यायाच्या प्रतिक्षेत आहे.
साक्षी कांबळे या तरुणीची अभिषेक कदम हा छेड काढत होता. तिला ब्लॅकमेल करत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून साक्षीने धाराशिव येथे मामाच्या घरी गळफास लावून घेत 14 मार्च रोजी आत्महत्या केली. आज तिचे लग्न ठरलेले होते. त्याआधीच तिने जीवनयात्रा संपवली.
साक्षी कांबळे आत्महत्या प्रकरणात धाराशिव पोलिसांनी काहीही कारवाई केलेली नाही. आत्महत्येला एक महिना होऊन गेला. मात्र बीड आणि धाराशिव येथील पोलिस शांत आहेत. यामुळे साक्षीच्या आईने उपमुख्यमंत्री शिंदे यांना पत्र लिहिले आहे.
माझी मुलगी साक्षीला हवाई सुंदरी व्हायचे होते. मात्र एका क्षणात ती नाहीशी झाली. काही मुलांनी तिची छेड काढली आणि साहेब तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेऊन जीवन संपवले. साहेब, आम्ही आस धरुन आहोत. तुमची भाची साक्षी या जगात परत येणार नाही, हे आम्हाला देखील माहिती आहे. मात्र त्या क्रूर नराधमांना देखील तेवढी शिक्षा होणे अपेक्षित आहे, अशी भावनिक साद साक्षीच्या आईने शिंदेंना घातली आहे.



