बाळ निपचित पडले, मृत्यू झाल्याचे समजून कुटुंबाचा आक्रोश

राज्यात एक अनोखा प्रकार घडला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात माहेरी आलेल्या महिलेचे दोन महिन्यांचे बाळ आजारी पडले, उलट्या आणि अति रडण्यामुळे ते निपचित पडले होते, काहीच हालचाल करत नव्हते.
धडगाव तालुक्यातील सूर्यफूल येथे राहणाऱ्या मीनाबाई सचिन पावरा या होळीनिमित्त तेलखेडी येथे आली होती. मात्र तिचे दोन महिन्याचे बाळ दूध पीत नव्हते की काहीच हालचालही करत नव्हते. त्यामुळे कुटुंबातील लोक खूप घाबरले.
बाळ गेल्याचे समजून त्यांनी आक्रोश सुरू केला. मात्र कुटुंबातील काही व्यक्तांनी ऐन वेळेस डॉ. गणेश तडवी यांच्याशी संपर्क साधला. डॉक्टरांनी तेथे येऊन बाळाची तपासणी केली. मात्र बाळाची कुठलीही हालचाल होत नव्हती.
तेवढयात डॉक्टरांनी बाळाच्या पायाला टिचकी मारली आणि बाळ हालचाल करत श्वास घ्यायला लागले आणि सगळ्यांच्याच चेहऱ्यावर हसू फुलले. बाळाला धडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सलाईन लावल्यानंतर बाळ नियमित श्वास घ्यायला लागले. आता बाळाची प्रकृती ठणठणीत असून दोन दिवसांनी त्याला डिस्चार्ज दिला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. डॉक्टरांच्या रुपाने देवदूतच आयुष्यात आला आणि बाळाला नवे जीवन देऊन गेला, अशी भावना व्यक्त होत आहे.



