महाराष्ट्र
औरंगजेब चोरच होता, तो देश लुटायला आला होता, त्याची कबर जेसीबी लावून उखडून टाका

- समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी अलीकडेच मुघल शासक औरंगजेबाबद्दल गौरवोद्द्गार काढले. औरंगजेब हा उत्तम शासक होता, असे वक्तव्य आझमी यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांचे विधीमंडळाच्या अधिवेशनातून निलंबन देखील करण्यात आले. मात्र अजूनही औरंगजेबाबाबतचा वाद शमायला तयार नाही. अलीकडेच भाजपचे नेते नितेश राणे यांनी अबू आझमींना औरंगजेबाच्या कबरी जवळ झोपवायला हवे, असे वक्तव्य केले. यानंतर राज्यात औरंगजेबाची कबर हटवावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
- दरम्यान, या सगळ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज, खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. औरंगजेबाची कबर ठेवून काय उपयोग आहे. तो देश लुटायला आला होता. तो चोरच होता. त्याची कबर जेसीबी लावून उखडून टाका. त्याचे उदात्तीकरण का करायचे? असा सवाल उदयनराजेंनी विचारला. यावेळी त्यांनी औरंगजेबाच्या कबरीवर दर्शनाला जाणाऱ्यांवर देखील निशाणा साधला.
- जे लोक औरंगजेबाच्या दर्शनाला जातात. ते का जातात? ते औरंगजेबाचे वंशज आहेत का? औरंगजेबावर एवढं प्रेम असेल तर त्याला तुमच्या घरी ठेवा. नाहीतर जिथून औरंगजेब आला होता, तिकडे तुम्हीही जावा, देश सोडून जावा, इथं कशाला थांबता, अशा शब्दांत उदयनराजेंनी औरंगजेबाचे समर्थन करणाऱ्यांना सुनावले आहे.