क्राईम
जमिनीचा वाद डोक्यात ठेवून हत्येचा कट!

- २०२२ साली झालेल्या जमिनीचा वाद डोक्यात ठेवून पाच जणांनी तरुणाच्या हत्येचा कट रचून त्याची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढत लोखंडी रॉड आणि दगडाने ठेचून त्याची हत्या करण्यात आली. अक्रम इकबालुद्दीन कुरेशी (वय- २२) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.
- मिळालेल्या माहितीनुसार, अक्रम हा ओला चालकाची गाडी घेऊन प्रेयसीच्या म्हणण्यानुसार भिवंडी पोलीस ठाणे हद्दीतील पोगाव गावाजवळ आला. त्यानंतर अज्ञात चार व्यक्तींनी लोखंडी रॉड आणि दगडाने ठेचून त्याची हत्या केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. त्यांनी दोन पथके तयार केली. घटनास्थळावरील दोन सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. यामध्ये अक्रम एका महिलेसोबत येताना दिसत आहे. पोलिसांनी तपास करत तरूणीचा शोध घेत तिला ताब्यात घेतले. तिची चौकशी केली असता तिने घटनेची माहिती दिली.
- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्रम या तरूणाचा जमिनीचा वाद हा २०२२ साली आरोपींसोबत प्रतापगड उत्तर प्रदेश येथे झाला होता. याच भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी अक्रमच्या हत्येचा कट रचला. अक्रम याची हत्या करण्यासाठी मुख्य आरोपी मोहम्मद कैफने आपली प्रेयसी जस्सी तिवारीची मदत घेतली. तिने अक्रमसोबत प्रेमाचे नाटक केले. नंतर जस्सीने कट रचल्याप्रमाणे अक्रमला भिवंडी येथील नियोजित स्थळी बोलावून घेतले. त्याठिकाणी आधीच चार आरोपी दबा धरून बसले होते. अक्रम येताच त्यांनी लोखंडी रॉड आणि दगडाने ठेचून त्याची हत्या केली.
- पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तपासाला सुरूवात केली. आरोपी महिलेला ताब्यात घेतले आहे. तसेच मोहम्मद कैफ, इसामुद्दिन रियाजुद्दीन कुरेशी, सलमान मो. शफिक खान, सुहेल अहमद कुरेशी या आरोपींना पोलिसांनी उत्तर प्रदेश येथून अटक केली आहे.