महाराष्ट्र

ब्रेकिंग! बीडमध्ये आणखी एका गँगला लावला मकोका

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकऱणानंतर बीड जिल्हा चांगलाच चर्चेत आला आहे. या प्रकरणात रोज काही ना काही अपडेट सुरुच आहेत. बीडच्या पोलिस अधीक्षकांचीही बदली केली. देशमुख हत्या प्रकरणानंतर पोलिसांनी सात आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई केली. त्यानंतर आता नवीन एसपींनी आणखी एका गँगवर मकोका अंतर्गत कारवाई केली आहे.

बीडमध्ये काही दिवसांपूर्वी बदनामीच्या रागातून घरात घुसून गोळीबार करण्यात आला होता. या घटनेत विश्वास दादाराव डोंगरे हा तरुण गंभीर जखमी झाला होता. डोंगरे याचे अक्षय आठवले यांच्यासोबत जुने वाद होते. यापूर्वी देखील आठवले आणि डोंगरे गटात जोरदार राडा झाला होता. दोन्ही गटांकडून परस्परविरोधी तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर आठवले याने डोंगरे यांच्या घरात घुसून गोळीबार केला होता. याच आठवले गँगवर आता एसपींनी कारवाई केली आहे.

पोलिसांनी या प्रकरणानंतर अक्षय आठवले गँगच्या सहा जणांविरोधात मकोका लावला. एकूण सहा आरोपींविरोधात ही कारवाई करण्यात आली. सहापैकी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. दोन आरोपी फरार आहेत. या प्रकरणात अक्षय आठवले, ओंकार सवाई, मनीष क्षीरसागर यांना अटक करण्यात आली आहे. तर सनी आठवले सह अन्य एकजण फरार आहेत.

Related Articles

Back to top button