महाराष्ट्र
धावत्या एसटी बसला भीषण आग

एसटी महामंडळाच्या धावत्या बसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. ठाण्यातील उथळसर प्रभाग समिती जवळील दर्ग्यासमोर ही घटना घडली असून चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानतेमुळे ६५ प्रवाशांचा जीव वाचला आहे. बसमध्ये आग लागल्याची माहिती समजताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर काही वेळातच आग विझवण्यात आली आहे.
आज सकाळी ठाण्याहून ६५ प्रवाशांना घेऊन भिवंडीच्या दिशेने निघालेल्या बसमध्ये अचानक भीषण आग लागली. बसचालक आनंद सवारे यांना ही बाब समजताच त्याने धावती बस रस्त्याच्या बाजूला घेऊन थांबवली. त्यानंतर सर्व प्रवाशांना बसमधून बाहेर काढलं.
आगीच्या घटनेमुळे घाबरेलेल्या अनेक प्रवाशांनी बसच्या खिडक्या फोडून खाली उड्या मारल्या. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझवली.