विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर महाविकास आघाडीमध्ये ऑल इज नॉट वेल असल्याचे दिसत आहे. महाविकास आघाडीमधील घटक पक्ष आगामी निवडणुका वेगळ्या लढण्याच्या तयारीत आहेत. अशातच आता महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणुकीतील पराभव आणि त्याआधी झालेल्या जागा वाटपांच्या बैठकांवरुन काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी खळबळजनक आरोप केला आहे.
विधानसभा निवडणुकीत जागा वाटपाची चर्चा वीस दिवस चालली, यात काही षडयंत्र होते का? नाना पटोले, संजय राऊत हे चर्चा करत होते. आम्हीही होतो, जागावाटपाचा तिढा दोन दिवसांत संपला असता तर १८ दिवस आम्हाला प्रचारासाठी मिळाले असते, असेही ते म्हणाले.
जागा वाटपात इतका वेळ वाया घालवला. यामध्ये काही प्लानिंग होते का? बैठक ११ वाजता असायची आणि यायचे दोन वाजता. अनेक नेते उशीरा यायचे. वीस दिवस हा जागा वाटपाचा घोळ चालला. त्यामुळे फटका बसला. वीस दिवस जागा वाटपात वेळ घालवण्यात काही षडयंत्र होते का? यात वाव आहे, अशी शंका वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे.