महाराष्ट्र
विरोधकांचा सूर अचानक बदलला

- विधानसभा निवडणुकीत महायुतीने प्रचंड मोठा विजय मिळवला. तर महाविकास आघाडीला मोठ्या पराभावला सामोरे जावे लागले. या पराभवानंतर मविआने ईव्हीएमवर शंका घेतली. अनेक ठिकाणी ईव्हीएमच्या विरोधात आंदोलने देखील केली. इतकेच नाही तर बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची आग्रही भूमिका मविआने घेतली. मात्र, आता काँग्रेसचे माजी आमदार आणि जालना विधानसभेतील पराभूत उमेदवार कैलास गोरंट्याल यांनी वेगळीच भूमिका घेतली.
- गोरंट्याल यांनी आपल्या पराभवासाठी ईव्हीएमला जबादार न धरता पराभवाचे दुसरेच कारण दिले. त्यांनी आपल्या पराभवासाठी ‘लाडकी बहीण योजने’ला जबाबदार धरले.
- लाडकी बहीण योजनेमुळे आपला पराभव झाल्याचे गोरंट्याल यांनी सांगितले. या योजनेमुळे काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांचाही पराभव झाल्याचा दावा गोरंट्याल यांनी केला आहे.
- सोशल मीडियावर लाडकी बहीण योजनेच्या निकषांत बदल करण्यात आल्याचे, लाडक्या बहिणींना अपात्र करण्याचे काम सरकारच्यावतीने सुरू असल्याचे मेसेज फिरत आहेत. यावरून गोरंट्याल यांनी महायुतीवर टीका केली.
- लाडकी बहीण योजनेत बदल होणार असल्याच्या चर्चांवर ते म्हणाले की, राज्यात महायुती सरकार लाडकी बहीण योजनेमुळेच सत्तेवर आले आहे. पण आता या सरकारचे असे झाले की, गरज सरो, वैद्य मरो. आता या योजनेचा लाभ महिलांना द्यायचा नाही, असे त्यांनी ठरवले आहे. बहिणींसाठी आम्ही रस्त्यावर उतरून संघर्ष करणार असल्याचा इशाराही गोरंट्याल यांनी दिला आहे.