महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये राज्यात भाजपप्रणित महायुतीची लाट आल्याचे पाहायला मिळाले. महायुतीने २३५ जागा जिंकून निर्विवाद यश मिळवले आहे. त्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गटानेही ५७ जागा जिंकत मोठा विजय मिळवला. २०२२ शिवसेनेत बंड झाल्यानंतर ४० आमदारांनी एकनाथ शिंदे यांना साथ देत सुरत मार्गे गुवाहाटी गाठली होती. त्यावेळी शिंदे यांना साथ देणाऱ्या आमदारांसह शिंदे गटाचे आणखी काही नवीन आमदारही निवडून आले आहेत.
दरम्यान राज्यातील विधानसभेचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे मंगळवारी पदाचा राजीनामा देऊ शकतात. पण त्यानंतर ते हंगामी मुख्यमंत्री म्हणून काम पाहतील. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. शिंदे हे उद्या राज्यपालांकडे राजीनामा सोपवणार आहेत. त्यानंतर आता नवीन मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या शपथविधीपर्यंत ते हंगामी मुख्यमंत्री म्हणून काम पाहतील.