महायुतीमध्ये गळती!

आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील दोन बडे नेते ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू आहेत. दरम्यान आज कोल्हापूरमध्ये महायुतीचा मेळावा होणार आहे. त्याआधीच भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट पक्षाला भगदाड पडले आहे.
भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडणूक संपताच (अजितदादा गट) कोल्हापूरचे उपाध्यक्ष आणि माजी आमदार ए.वाय. पाटील यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. महायुतीतील पक्षांना कोल्हापुरात एकाचवेळी असा धक्का बसल्याने विधानसभा निवडणुकीत महायुतीसमोर होणारी गळती रोखण्याचे आव्हान असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून पाटील हे नाराज असल्याची चर्चा होती. पाटील हे अजितदादा गटाचे कोल्हापूरचे उपाध्यक्ष होते. पाटील हे राधानगरी मतदारसांघातून निवडून लढविण्यास उत्सुक आहेत. तसेच त्यांचे मेहुणे माजी आमदार के.पी. पाटील हे देखील इथून लढण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे येथून कोणाला तिकीट मिळणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. अजितदादा गटाला पाटील यांची नाराजी दूर करण्यात यश आले नाही.
दुसरीकडे भाजपा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष देसाई यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. देसाई यांनी सुद्धा राधानगरी मतदारसंघातून निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. मात्र पक्षाकडून उमेदवारी मिळणार नाही हे स्पष्ट होताच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता महायुतीसमोर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणारी गळती रोखण्याचे मोठे आव्हान असणार आहे.
महायुतीतर्फे अजितदादा पवार यांनी कागलमधून हसन मुश्रीफ यांना उमेदवारी जाहीर केली आहे. समरजित घाटगे कागलमधून लढण्यास उत्सुक होते. मात्र ही जागा महायुतीत अजित पवारांकडे जाण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे कदाचित घाटगे हे शरद पवारांकडे जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.