महायुतीच्या रॅलीत तगडा राडा

सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे रणधुमाळी दिसत आहे. विविध राजकीय पक्षांकडून प्रचारांना वेग आला आहे. आरोप – प्रत्यारोप केले जात आहेत. परिणामी निवडणुकीतील रंगत आणखी वाढली आहे. लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आता मंगळवारी मतदान होणार आहे.
दरम्यान, ठाणे शहरात काल महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये अचानक दोन टोळ्यांमध्ये झालेल्या राड्यामुळे वातावरण तंग झाले होते. पोलिसांच्या समोर घडलेल्या या प्रकारामुळे पोलीस सतर्क झाले व त्यांनी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी त्वरित दोन्ही टोळ्यांच्या गुंडांची पांगापांग केली.सिद्धू अभंगे आणि अजय पासी यांच्या दोन टोळ्यांमध्ये पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडला आहे.
रॅलीमध्ये भर रस्त्यात हा प्रकार घडल्याने ठाण्यात कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महायुतीचे उमेदवार म्हस्के यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी म्हस्के यांनी मोठे शक्तिप्रदर्शन केले.
मात्र, या मिरवणुकीत काही दिवसांपूर्वी शिंदे गटात प्रवेश केलेले पासी आणि यूट्यूब भाई म्हणून प्रसिद्ध असलेला अभंगे हे देखील आपल्या साथीदारांसह या रॅलीत सहभागी झाले होते.
हे दोन्ही गुंड कोपरी परिसरातच राहात असून वर्चस्वासाठी या दोन्ही टोळ्यांमध्ये वैमनस्य आहे. त्यामुळे या टोळ्यांमधून विस्तव जात नाही. म्हस्के यांची रॅली बाजारपेठेतील मराठी ग्रंथ संग्रहालयासमोर आली असतानाच दोन्ही टोळ्यांचे म्होरके एकमेकांसमोर आले.
त्यानंतर या दोन्ही टोळ्यांमध्ये चक्क पोलिसांसमोरच जोरदार हाणामारी झाली. एकमेकांचे कपडेदेखील फाडण्यात आले. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करीत या गुंडांची पांगापांग केली. याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.