महाराष्ट्र
मोठी बातमी! पिंपरी चिंचवडमध्ये उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक
महात्मा फुले, डॉ. आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा उभारताना लोकांकडे भीक मागितली, असे वादग्रस्त वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलं होत. त्याच्या या विधानानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले असतानाच आज पिंपरी चिंचवड येथे पाटील यांच्यावर अज्ञात व्यक्तींकडून शाईफेक करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये मोरया गोसावी महोत्सवासाठी चंद्रकांत पाटील आज आले होते. त्यावेळी ते आपल्या एका कार्यकर्त्याच्या घरी थांबले होते. कार्यकर्त्याच्या घरून निघाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी 3 जणांना ताब्यात घेतलं. शाईफेक करणारे नेमके कोणत्या पक्षाचे किंवा संघटनेचे समर्थक आहेत याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही. महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावरील वादग्रस्त विधानावर चंद्रकांत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. तरी सुद्धा त्यांच्यावर शाईफेक करत निषेध नोंदवण्यात आला आहे.