महाराष्ट्र
ठाकरे गटाचे लोक माझ्या अंगावर आले; भावना गवळी यांचा मोठा आरोप

अकोल्यात शिंदे गट व ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते. त्यावेळी रेल्वे स्थानकावर घडलेल्या प्रकाराबाबत खासदार भावना गवळी यांनी तक्रार दाखल केली आहे.
अकोल्याहून विदर्भ एक्स्प्रेसने मुंबईकडे जात असताना शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी माझ्या अंगावर आले, असा आरोप शिंदे गटाच्या खासदार गवळी यांनी केला आहे.
ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना आपल्याविरोधात घोषणाबाजी करण्यासाठी खासदार विनायक राऊत आणि आमदार नितीन देशमुख यांनी चिथावलं असल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्याची मागणी गवळी यांनी केली आहे.
अकोला रेल्वे स्टेशनवर अत्यंत घाणेरडे राजकारण पाहायला मिळाले. त्या जमावात माझा जीवही गेला असता. त्यामुळे खासदार विनायक राऊत, आमदार नितीन देशमुख या दोघांवर गुन्हे दाखल होऊन अटक झाली पाहिजे. माझी तक्रार मी राज्य महिला आयोग, लोकसभा अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्रालयाकडे करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे, असे गवळी म्हणाल्या.



