क्राईम
वैष्णवी प्रकरण; प्रेम, लग्न, हुंडा, छळ अन् धमक्या, सगळ्याची सूत्रधार करिश्मा

- पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात वैष्णवीची नणंद हीच संपूर्ण कटाची सुत्रधार असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. त्यामुळे आता संपूर्ण हगवणे कुटुंबाच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. वैष्णवीचा छळ करण्यामध्ये तिची नणंद करिश्मा हगवणेच पुढे होती. निलेश चव्हाण याचा या संपूर्ण प्रकरणात तिने वापर करून घेतला. त्यामुळे याप्रकरणात निलेश याला सहआरोपी करण्यात आले आहे.
- वैष्णवी अन् शशांकचे लग्न म्हणजेच एक मोठा कट होता. हा कट वैष्णवीच्या कुटुंबाकडून पैसे उकळण्यासाठी रचण्यात आला होता. या कटाची मास्टरमाईंड करिश्मा होती, असे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. करिश्माने वैष्णवीच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती पाहून आपल्या भावाला तिच्यासोबत प्रेमसंबंध ठेवण्यास सांगितले होते. तसेच वैष्णवीला हगवणे कुटुंबाची सून करून घेण्यासाठी देखील करिश्मानेच शशांकला प्रवृत्त केले होते, अशी नवी माहिती आता पोलीस तपासातून बाहेर आली आहे.
- करिश्माने वैष्णवीच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती उत्तम असल्याचे हेरले. वैष्णवीच्या कुटुंबाकडून लग्नात त्यांना चांगला हुंडा मिळू शकतो, याची खात्री पटल्यावर तिने भाऊ शशांकला वैष्णवीसोबत लग्न करण्यास सांगितले. वैष्णवीच्या वडिलांनी लग्नामध्ये तब्बल 51 तोळं सोनं, चांदीची भांडी आणि फॉर्च्युनर कार गिफ्ट म्हणून दिली. लग्नानंतर वैष्णवीच्या वडिलांनी शशांकला अधिक महिन्यात सोन्याची अंगठी, दीड लाखाचा मोबाईलसुद्धा दिला.
- वैष्णवी आणि शशांकचे लग्न झाल्यानंतर करिश्माने मात्र वैष्णवीचा छळ सुरु केला. तिला सतत माहेरच्यांकडून पैसे आणण्यासाठी त्रास दिला जात होता. तर वैष्णवीच्या माहेरच्यांना धमकावण्यासाठी करिश्माने निलेश चव्हाण याचा वापर केल्याचे समोर आले आहे. याच छळाला कंटाळून वैष्णवीने जीवन संपवल्याचे वृत्त समोर आले.



