क्राईम
टवाळखोरांनी काढली मुलीची छेड

- राज्यात घडलेली एक संतापजनक घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. नागपूर शहरात आपल्या मुलीची छेड काढणाऱ्या टवाळखोरांना जाब विचारायला गेलेल्या वडिलांची भर रस्त्यात निर्घृण हत्या करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत व्यक्ती नरेश वालदे हे पेंटिंगचे काम करीत होते.
- नागपूर येथील इमामवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली. वालदे (53) हे आपल्या मुलींना त्रास देणाऱ्या गुंडांपासून वाचवण्यासाठी सतत प्रयत्न करत होते. या कारणावरून त्यांचे त्या गुंडांशी अनेक वेळा वादही झाले होते. काही दिवसांपूर्वी आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली होती.
- काल दुपारी वालदे यांना अज्ञात नंबरवरून फोन आला आणि त्यांना जाटतरोडी भागात बोलावण्यात आले. ते तेथे पोहोचताच आधीच थांबलेल्या आरोपींनी धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर हल्ला केला. यात गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. आरोपी हल्ल्यानंतर घटनास्थळावरून फरार झाले.
- या हत्येच्या आदल्या दिवशी म्हणजे 25 मार्च रोजी वालदे यांच्या घरावर काही अज्ञातांनी दगडफेक केली होती. त्यांनी याबाबत इमामवाडा पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. मात्र, त्यानंतर लगेचच दुसऱ्याच दिवशी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला.