ब्रेकिंग! महाकुंभमेळ्यात मध्यरात्री चेंगराचेंगरी, दहा जणांचा मृत्यू; अमृतस्नान रद्द
उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभ पर्व सुरू आहे. या महाकुंभातून धक्कादायक बातमी आली आहे. महाकुंभमेळ्यात मध्यरात्री चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. या चेंगराचेंगरीत अनेक भाविक जखमी झाले आहेत. तर दहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. आखाडा परिषदेने मौनी अमावस्येनिमित्त होणारे अमृतस्नान रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष रवींद्र पुरी यांनी दिली. या निर्णयानंतर आज कोणत्याही आखाड्याकडून अमृतस्नान होणार नाही. दरम्यान, आता येथील परिस्थिती नियंत्रणात आली आहे. त्यामुळे आधी जे बॅरिकेट्स लावले होते ते आता काढून टाकण्यात आले आहेत. त्यामुळे भाविकांच्या येण्याजाण्याच्या अडचणी कमी झाल्या आहेत.
पुरी यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, जी घटना घडली, त्यामुळे आम्ही अतिशय दुःखी झालो आहोत. आमच्या बरोबर हजारो भाविक आहेत. त्यामुळे जनहिताचा विचार करून निर्णय घेण्यात आला आहे की, आज आखाडे अमृत स्नानात सहभागी होणार नाहीत. आजच्या ऐवजी वसंत पंचमीच्या दिवशी स्नानासाठी यावे असे आवाहन आम्ही भाविकांना केले आहे.
दरम्यान चेंगराचेंगरीची घटना मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे. मौनी अमावस्येनिमित्त शाही स्नान होते. त्यामुळे स्नानास जाण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. ज्या ठिकाणी लोक झोपले होते, त्याच्या मागील बाजूने लोक आले. त्यानंतर चेंगराचेंगरी झाली. त्याच वेळी कोट्यावधी लोक संगमाच्या तटावर स्नान करत होते. घटनेची माहिती मिळताच प्रशासन अलर्ट झाले आहे.