सोलापूर
ब्रेकिंग! सोलापूर विमानतळावर नोकरीचे आमिष दाखवून फसवणुकीचा नवा फंडा

- सोलापूर विमानतळावरून लवकरच प्रवासी विमानसेवा सुरू होणार असल्याच्या घोषणेने शहरातील तरुणांमध्ये आशा निर्माण झाली आहे. मात्र, या संधीचा गैरफायदा घेत काही फसवे लोक तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा गोरखधंदा सुरू केला आहे. सोलापूर विमानतळावर नोकऱ्या उपलब्ध आहेत, अशा खोट्या जाहिराती आणि फोन कॉल्सद्वारे बेरोजगार तरुणांची फसवणूक केली जात आहे.
- फसवे लोक स्वत:ला विमानतळ अथवा नागरी उड्डाण मंत्रालयाशी संबंधित अधिकारी असल्याचे भासवत आहेत. ते सोलापूर विमानतळासाठी विविध पदांसाठी अर्ज मागवून नोकरी देण्याचे खोटे आश्वासन देतात. यासाठी 5,000 ते 50,000 रुपयांपर्यंत “प्रोसेसिंग फीस,” “ट्रेनिंग फीस,” किंवा “सिक्युरिटी डिपॉझिट” म्हणून रक्कम मागितली जाते. या फसवणुकीत तरुणांचा पैसा घेऊन ते गायब होतात, आणि नंतर त्यांच्याशी संपर्क करणे अशक्य होते.
- यासंदर्भात सोलापूर विकास मंचाचे सदस्य विजय कुंदन जाधव म्हणाले, माझ्याकडे अनेक वेळा लोकांच्या कॉल्स येतात, जिथे ते सोलापूर विमानतळावर नोकरीसाठी अर्ज कसा करायचा, अशी विचारणा करतात. मला स्वतःला काही फसवे कॉल आले आहेत, ज्यात मला खोट्या जाहिरातींचा अनुभव आला. सोलापूरच्या तरुणांनी सतर्क राहून अशा प्रकारांना बळी पडू नये, हीच माझी विनंती आहे.
- सोलापूरच्या तरुणांनी अशा फसवणुकीपासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी खालील काळजी घेणे आवश्यक आहे:
- कोणतीही नोकरीची जाहिरात अधिकृत सरकारी वेबसाईट (जसे की www.aai.aero) किंवा नागरी उड्डाण मंत्रालयाकडूनच पाहा.
- कोणत्याही प्रकारच्या नोकरीसाठी प्रोसेसिंग फीस किंवा सिक्युरिटी डिपॉझिट मागितल्यास ती फसवणूक असल्याचे समजावे.
- कोणतीही नोकरी संबंधित माहिती मिळाल्यास त्याची अधिकृतता तपासण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाशी किंवा नागरी उड्डाण मंत्रालयाशी संपर्क साधा.
- अनोळखी नंबरवरून आलेल्या कॉल्सना उत्तर देताना सतर्क राहा. जर कोणी वैयक्तिक माहिती मागत असेल तर ती देऊ नका.
- जर फसवणूक झाली असेल किंवा तशी शक्यता वाटत असेल तर पोलिसांत तक्रार नोंदवा.
- सोलापूर विमानतळावरील नोकऱ्यांविषयी कोणतीही अधिकृत जाहिरात झाल्यास ती केवळ सरकारी माध्यमांद्वारे प्रसारित होईल. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका. आपण सतर्क राहून या फसवणूक प्रकरणांना आळा घालू शकतो.