राजकीय

काँग्रेसमध्ये एकाच दिवसात दोन राजकीय भूकंप

सध्या राज्यातील विविध भागात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर आता खऱ्या अर्थाने प्रचाराला वेग आला आहे. काही राजकीय पक्षांनी आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे आगामी काळात या निवडणुकीतील रंगत आणखी वाढणार आहे. दरम्यान ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला आज दोन मोठे धक्के बसले. मुंबई महापालिकेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते रवी राजा आज भाजपमध्ये दाखल झाले. तसेच कोल्हापूर उत्तरमधून तिकीट नाकारण्यात आल्यानंतर काँग्रेसच्या विद्यमान आमदार जयश्री जाधव यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. काँग्रेसचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. विधानसभा निवडणुकीतील तिकीट वाटपानंतर काँग्रेसमध्ये नाराजी उफाळून आली आहे.

विधानसभा निवडणुकीत आमदार जयश्री जाधव यांना काँग्रेसने उमेदवारी दिली नाही. त्यांच्याऐवजी राजेश लाटकर यांना तिकीट मिळाले. पण नंतर त्यांच्याही उमेदवारीला विरोध झाला. तेव्हा त्यांना तिकीट नाकारून माजी आमदार मालोजीराजे यांच्या पत्नी मधुरिमाराजे यांना उमेदवारी देण्यात आली. या घडामोडींमुळे आमदार जाधव नाराज झाल्या. त्यांनी आज थेट शिंदे गटात प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयामुळे मतदारसंघातील शिंदे गटाच्या उमेदवाराला फायदा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Related Articles

Back to top button