पाकिस्तानचे लष्करी प्रमुख फील्ड मार्शल आसिम मुनीर यांनी अमेरिकेच्या भूमीतून भारताला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली आहे. टॅम्पा, फ्लोरिडामध्ये आयोजित एका ब्लॅक-टाय डिनरमध्ये मुनीर म्हणाले, आम्ही अण्वस्त्रसंपन्न राष्ट्र आहोत. जर आम्हाला वाटले की, आम्ही बुडालो आहोत, तर आम्ही अर्ध्या जगाला सोबत घेऊन बुडू. दरम्यान हे विधान अमेरिकेच्या भूमीवरून दिले गेले असल्याने याचे महत्त्व आणखी वाढले आहे.
भारतासोबतच्या चार दिवसांच्या संघर्षानंतर दोन महिन्यांत दुसऱ्या अमेरिकन भेटीत मुनीर यांनी सिंधू नदीवरील नियंत्रणावरून भारतावरही निशाणा साधला. ते म्हणाले, आम्ही भारत धरण बांधण्याची वाट पाहू. जेव्हा ते बांधेल तेव्हा आम्ही ते दहा क्षेपणास्त्रांनी नष्ट करू. सिंधू नदी ही कोणत्याही भारतीय कुटुंबाची मालमत्ता नाही. आमच्याकडे क्षेपणास्त्रांची कमतरता नाही, अलहमदुलिल्लाह.
मुनीर यांनी भारताची तुलना ‘महामार्गावर धावणाऱ्या मर्सिडीज’ आणि पाकिस्तानची तुलना ‘गारगोटी आणि दगडांनी भरलेल्या ट्रक’शी केली. भारत महामार्गावर फेरारीसारखे चमकणारी मर्सिडीज आहे, परंतु आम्ही दगडाने भरलेला ट्रक आहोत. जर ट्रक कारला धडकला तर कोणाचे नुकसान होईल? मुनीर यांनी दावा केला की, भारत स्वतःला विश्व गुरु म्हणून सादर करू इच्छितो, परंतु प्रत्यक्षात ते त्यापासून दूर आहेत.