देश - विदेश
रेल्वेच्या तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलणार

- तुम्ही देखील रेल्वेने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्यापासून तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलणार आहे. माहितीनुसार, 15 जुलैपासून तात्काळ तिकीट बुकिंग आधारशी प्रमाणीकरण केल्यानंतरच करण्यात येणार आहे. तर रेल्वे एजंट अर्ध्या तासानंतर तिकिटे बुक करू शकतील. तात्काळ विंडो उघडल्यावर एजंट सर्व तिकिटे बुक करत असल्याने सर्वसामान्यांना तिकिटे बुक करण्यात अडचण येत असल्याने रेल्वेकडून आता नवीन नियम लागू करण्यात येत आहे. या नियमामुळे आता सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
- रेल्वे मंत्रालयाने एक परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकात म्हटले आहे की एक जुलै 2025 पासून तात्काळ तिकिटे फक्त आधारद्वारे पडताळणी केलेल्या वापरकर्त्यांनाच इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनच्या वेबसाइट/ॲपद्वारे बुक करता येतील. यानंतर, 15 जुलैपासून तात्काळ बुकिंगसाठी आधार-आधारित ओटीपी प्रमाणीकरण देखील अनिवार्य केले जाईल. तसेच तात्काळ तिकिटे संगणकीकृत पीआरएस (पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टम) काउंटर/भारतीय रेल्वेच्या अधिकृत एजंट्सद्वारे बुकिंगसाठी उपलब्ध असतील जेव्हा सिस्टमद्वारे जनरेट केलेला ओटीपी पडताळला जाईल. हा ओटीपी वापरकर्त्यांनी बुकिंगच्या वेळी दिलेल्या मोबाइल नंबरवर पाठवला जाईल.
- तात्काळ रेल्वे तिकीट बुकिंगसाठी विंडो सकाळी दहा वाजल्यापासून उघडते. तथापि, या काळात फक्त एसी कोचची तिकिटे बुक केली जातात. त्याचवेळी स्लीपर कोचची तिकिटे सकाळी 11 वाजल्यापासून तात्काळ विंडोवर बुक केली जातात. या काळात सामान्य लोकांना मोठ्या अडचणीने तात्काळ तिकिटे मिळू शकतात. तर रेल्वेच्या नवीन परिपत्रकानुसार, एजंटना सकाळी 10 ते 10.30 वाजेपर्यंत एसी श्रेणीसाठी आणि सकाळी 11 ते 11.30 वाजेपर्यंत स्लीपर श्रेणीसाठी ‘तत्काळ’ तिकिटे बुक करण्यास बंदी असेल. यामुळे सामान्य लोकांना तत्काळ तिकिटे सहजपणे बुक करण्याची संधी मिळेल.



