ब्रेकिंग! मिट्टी में मिलाने का वक्त आ गया है, पाकिस्तानच्या पापांचा घडा भरला

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी निष्पाप नागरिकांना ज्या क्रूरतेने मारले त्याबद्दल संपूर्ण देश दुःखी आहे. संपूर्ण राष्ट्र सर्व पीडित कुटुंबांच्या दुःखात त्यांच्यासोबत असून आता दहशतवाद्यांची जी काही थोडीफार जमीन उरली आहे, ती नष्ट करण्याची वेळ आली असल्याचे म्हणत त्यांना ‘मिट्टी में मिलाने का वक्त आ गया है’ असा थेट इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. पहलगाम हल्ल्यावर मोदींनी पहिल्यांदाच जाहीरपणे प्रतिक्रिया दिली आहे. ते बिहारमधील मधुबनी येथे आयोजित एका जाहीर सभेत बोलत होते. मोदी यांनी प्रथम पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली आणि नंतर भाषणाला सुरूवात केली. पहलगाम हल्ल्यात कोणीतरी आपला मुलगा, भाऊ किंवा पती गमावला. त्यापैकी काही बंगाली बोलत होते, काही कन्नड बोलत होते, काही मराठी, उडिया, गुजराती बोलत होते आणि काही बिहारचे होते.
आज काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत, त्या सर्वांच्या मृत्यूबद्दलचे आपले दुःख सारखेच आहे. हा हल्ला केवळ निःशस्त्र पर्यटकांवरच झाला नाही; देशाच्या शत्रूंनी भारताच्या आत्म्यावर हल्ला करण्याचे धाडस केले आहे. ज्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केला, ज्यांनी या हल्ल्याचा कट रचला त्यांना कल्पनाही करता येणार नाही त्यापेक्षा मोठी शिक्षा मिळेल. दहशतवादाचा नायनाट करण्याची वेळ आली आहे असल्याचेही मोदी म्हणाले.