Happy Birthday Rajinikanth: कुली, कंडक्टर ते सुपरस्टार

सुपरस्टार रजनीकांत यांचा आज ७२ वा वाढदिवस. केवळ साऊथच नव्हे, तर बॉलिवूड विश्व गाजवणारे अभिनेते म्हणून रजनीकांत यांचं नाव घेतलं जातं. दक्षिण भागात तर रजनीकांत यांची देवाप्रमाणे पूजा देखील केली जाते. आज जरी रजनीकांत यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली असली, तरी त्यांच्या हा प्रवास सोपा नव्हता. कधीकाळी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांना कुलीचं काम देखील करावं लागलं होतं.
रजनीकांत यांचे खरे नाव शिवाजी राव गायकवाड आहे.
या सुपरस्टारचा जन्म १२ डिसेंबर १९५० रोजी बंगळुरूमधील एका गरीब कुटुंबात झाला. रजनीकांत यांना एकूण चार भावंडं होती. या भावंडांमध्ये सर्वात लहान रजनीकांत होते. रजनीकांत यांचे वडील रामोजीराव गायकवाड हे हवालदार होते. तर, आई जिजाबाई या कुटुंब सांभाळत होत्या. मात्र, आईच्या निधनानंतर रजनीकांत यांचे कुटुंब विस्कळीत झाले. रजनीकांत यांच्या आईचे निधन झाल्यानंतर घरची परिस्थिती देखील बिकट झाली. अशावेळी आपल्या कुटुंबाकडे पाहून रजनीकांत यांनी कुली म्हणून काम करायला सुरुवात केली. यानंतर त्यांनी काही काळ सुतार काम देखील केले. यानंतर ते बंगळुरू परिवहन सेवेत बस कंडक्टर म्हणून काम करू लागले. बस कंडक्टरची नोकरी करण्यापूर्वी त्यांनी अनेक छोटीमोठी कामे केली. कुटुंबासाठी नोकरी करत असले, तरी त्यांना अभिनय क्षेत्रात काम करायचे होते. रजनीकांत यांना अभिनेता व्हायचे होते, हे केवळ त्यांच्या एका मित्राला माहित होते. त्यांचे मित्र राज बहादूर यांनी रजनीकांत यांचे हे स्वप्न जिवंत ठेवले. त्यांनीच रजनीकांत यांना मद्रास फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेण्यास सांगितले. त्यांनी १९७३मध्ये मद्रास फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला आणि अभिनयाचा डिप्लोमा केला. २३ ऑगस्ट १९७५ रोजी रजनीकांत यांचा पहिला चित्रपट ‘अपूर्व रागंगल’ प्रदर्शित झाला.
रजनीकांत यांनी आपल्या पहिल्याच चित्रपटापासून लोकांना वेड लावले होते. त्यानंतर अभिनेत्याने कधीच मागे वळून पाहिले नाही आणि केवळ दक्षिणेतच नव्हे, तर संपूर्ण देशात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली.