देश - विदेश

ब्रेकिंग! पाकिस्तानमध्ये मोठा आत्मघाती हल्ला

  • पाकिस्तान दिवसेंदिवस बॉम्बस्फोट हल्ल्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. पाकिस्तानध्ये एक भीषण हल्ला झाला आहे. लष्करी ताफ्याला लक्ष्य करून केलेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटात १३ सैनिक ठार झाल्याचे वृत्त आहे. तर दहा सैनिक गंभीर जखमी झाले आहेत. खैबर पख्तूनख्वा प्रांतातील उत्तर वझिरीस्तान जिल्ह्यात हा स्फोट झाल्याचे सांगितले जात आहे.
  • खैबर पख्तूनख्वा प्रांतातील उत्तर वझिरीस्तानच्या वायव्य जिल्ह्यातून लष्करी काफिला जात असताना हल्लेखोरांकडून हल्ला करण्यात आला. एका स्थानिक सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, आज सकाळी आत्मघातकी हल्लेखोरांनी स्फोटकांनी भरलेले वाहन लष्करी ताफ्यावर धडकवले. त्यानंतर झालेल्या स्फोटात १३ सैनिक ठार झाले. तर १० सैनिक आणि १९ नागरिकही गंभीर जखमी झाले आहेत. या स्फोटात जवळपासच्या घरांचेही नुकसान झाले. स्फोटामुळे दोन घरांचे छप्परही कोसळले असून त्यात सहा मुले जखमी झाली. हल्ला झालेले ठिकाण पाकिस्तानमधील सर्वात तणावपूर्ण भाग आहे. 
  • येथे तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) चे हल्ले अनेकदा झाले आहेत. दरम्यान, आतापर्यंत कोणत्याही गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.मात्र, तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) किंवा त्याच्याशी संबंधित एखाद्या गटाचा या हल्ल्यामागे हात असू शकतो.
  • दरम्यान, लष्कर आणि सुरक्षा संस्था परिसरात शोध मोहीम राबवत आहेत. तर जखमींना जवळच्या लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानच्या सुरक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Related Articles

Back to top button