भारतावरील हल्ल्यासाठी गौरी, शाहीन, गझनवी अन् 130 अणुबॉम्ब तयार

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी करार स्थगित केल्यामुळे पाकिस्तान नाराज आहे. दररोज त्यांचे नेते काही ना काही विधाने करत आहेत. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी रक्ताचे पाट वाहतील, अशी धमकी दिली होती.
आता पाकिस्तानी रेल्वेमंत्री हनीफ अब्बासी यांनी भारताला अणुबॉम्बची धमकी दिली आहे. तसेच तुम्ही आमचे पाणी बंद कराल, तर आम्ही तुमचा श्वास बंद करू. शाहीन, गझनवी आणि 130 अणुबॉम्ब भारतासाठीच ठेवली आहेत. जर भारताने कोणतेही धाडसी पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला तर भारताला त्याची किंमत मोजावी लागेल,असे देखील ते म्हणाले. रावळपिंडी येथे पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, जर भारताने पाकिस्तानचे पाणी रोखले तर त्याला योग्य उत्तर दिले जाईल.
सिंधूवर हल्ला केला, त्यामुळे मला सिंधू नदीच्या काठावर उभे राहून भारताला सांगायचे आहे की सिंधू आमची आहे आणि ती आमचीच राहील. एकतर आमचे पाणी या नदीतून वाहेल किंवा त्यांचे रक्त त्यातून वाहेल. भारताची लोकसंख्या आपल्यापेक्षा जास्त असू शकते, पण पाकिस्तानचे लोक धाडसी आहेत. आम्ही सीमेवर आणि पाकिस्तानच्या आतही लढू. आमचा आवाज भारताला योग्य उत्तर देईल, अशी धमकी भुट्टो यांनी दिली होती.



