मनोरंजन

‘छावा’च्या सीन दरम्यान हसणाऱ्या, मस्करी करणाऱ्यांना घडवली अद्दल

विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला ‘छावा’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या दोन आठवड्यांनंतरही सोलापूरसह अन्य भागात तुफान चर्चेत आहे. अजूनही हा चित्रपट थिएटरमध्ये बघण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहेत. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित या चित्रपटाचा क्लायमॅक्स पाहिल्यानंतर प्रेक्षक पाणावलेल्या डोळ्यांनी थिएटरमधून बाहेर पडत आहेत.

मात्र नवी मुंबईच्या कोपर खैराणे थिएटरमध्ये वेगळेच चित्र पहायला मिळाले. तिथल्या बालाजी मूव्हीप्लेक्स थिएटरमध्ये ‘छावा’ या चित्रपटाच्या क्लायमॅक्सदरम्यान काही प्रेक्षक हसताना आणि मस्करी करताना दिसल्याने त्यांना सर्वांसमोर माफी मागण्यास भाग पाडण्यात आले. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गणोजी आणि कान्होजी या आपल्याच माणसांनी केलेल्या फितुरीमुळे छत्रपती संभाजी महाराजांना कैद करण्यात मुघल शासक औरंगजेबाला यश मिळते. त्यानंतर त्यांचा अतोनात छळ केला जातो. हाच सीन ‘छावा’च्या क्लायमॅक्समध्ये दाखवण्यात आला आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा छळ पाहून प्रेक्षकांना अश्रू अनावर झाल्याशिवाय राहत नाही. मात्र, याच सीनदरम्यान थिएटरमधील पाच जण हसताना आणि मस्करी करताना दिसले. यावरून संतप्त झालेल्या इतर प्रेक्षकांनी त्यांना थिएटरमध्येच गुडघ्यावर बसून माफी मागण्यास भाग पाडले.

सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओमध्ये एक जण कान पकडून म्हणतोय, मी छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागतो. पण थिएटरमधील इतर प्रेक्षक त्याला छत्रपती संभाजी महाराजांचीही माफी मागण्यास सांगतात. त्यानंतर तो पुढे म्हणतो, छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट थिएटरमध्ये सुरू होता. तेव्हा आम्ही हसलो आणि मस्करी केली. त्यामुळे आम्हाला माफी मागण्यास सांगितले गेले.

Related Articles

Back to top button