देश - विदेश
मोठी बातमी! आता रिचार्जसाठी मोजावे लागणार जास्त पैसे

सोलापुरातच नव्हे तर संपूर्ण राज्यात स्मार्ट फोन वापरणार्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काही भागात तर फाईव्ह जीची वेगवान सेवा सुरू झाली आहे. मात्र, अशातच टेलिकॉम कंपन्या तुम्हाला आर्थिक झटका देण्याच्या विचारात आहेत. आगामी काळात तुम्हाला रिचार्जसाठी जास्त पैसे मोजावे लागतील.
अलीकडेच जिओ व एअरटेलने राज्यातील काही भागांमध्ये सुपरफास्ट अशा फाईव्ह जी ची सेवा सुरू केली आहे. दरम्यान जिओ व एअरटेलकडून रिचार्ज प्लॅनमध्ये सुमारे 10 टक्क्यांची वाढ होऊ शकणार आहे. याचा अर्थ तीनशे रुपयांच्या प्री-पेड प्लॅनची किंमत आता 330 रुपये होऊ शकते. याशिवाय एक हजार रुपयांचे प्लॅनसही महागणार आहेत. चालू वर्षाच्या डिसेंबर महिन्यापासून ही वाढ अपेक्षित आहे.
जिओने अलीकडेच फाईव्ह-जीचे मार्केटिंग वेगाने वाढविले आहे. शहरी भागांपासून ग्रामीण भागापर्यंत जिओ विस्तारलेला आहे. मात्र, एअरटेल व जिओकडून ग्राहकांना आर्थिक दणका बसण्याची शक्यता आहे.