देश - विदेश
खराब रस्त्यावरून गडकरींनी मागितली जनतेची माफी

खराब रस्त्यावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर सभेत लोकांची माफी मागितली आहे. खराब रस्त्यावरून तुम्हाला त्रास झाला मी माफी मागतो, असे ते म्हणाले. मध्यप्रदेशमधील मंडला येथे रस्त्यांच्या भूमीपूजन कार्यक्रमाला ते आले होते.
यावेळी त्यांच्याकडे जबलपुर-मंडला या ४०० कोटींच्या रस्त्याचे काम खराब झाल्याची तक्रार लोकांनी केली. यावर गडकरींनी, जर चूक झाली असेल तर माफीही मागायला हवी. ४०० कोटींचा खर्च करून ६३ किमी लांबीच्या दोन लेनचा रस्ता बनविणे सुरू आहे.
मी रस्त्याच्या कामावर खुश नाही, असे गडकरी म्हणाले. ४०० कोटी रुपये खर्चून बारेला ते मंडला यादरम्यान बांधण्यात येत असलेल्या ६३ किमीचा टू लेन रोडवरील कामांबाबत मी समाधानी नाही.
प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या कामाला स्थगिती देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. जुने काम दुरुस्त करून नवीन निविदा मागवल्या आहेत. हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेशही दिले आहेत. आत्तापर्यंत तुम्हाला जो त्रास झाला, त्याबद्दल माफ करा, असे गडकरी म्हणाले.