राजकीय

उद्धव ठाकरेंचे तीन नेते फडणवीसांच्या भेटीला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर ठाकरे गटाचे नेते फडणवीस यांच्या भेटीकरिता सागर बंगल्यावर पोहोचले. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चांना सुरुवात झाली आहे.

ठाकरे गटाचे जेष्ठ नेते सुभाष देसाई, सचिव आमदार मिलिंद नार्वेकर तसेच आमदार अंबादास दानवे हे सागर बंगल्यावर फडणवीसांच्या भेटीकरिता पोहोचले. दुपारी फडणवीस यांना भेटण्याकरिता तिन्ही नेते सागर बंगल्यावर गेले.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष बदलण्यात येऊ नयेत, यासाठी ही भेट असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तशी विनंती आजच्या फडणवीस यांच्या भेटीत ठाकरे गटाचे नेते करतील, अशी माहिती मिळत आहे.

गत दोन आठवड्यांपूर्वी शिंदे गटाची एक बैठक संपन्न झाली होती. त्या बैठकीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या अध्यक्षपदावरून हटवण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. सरकारी पातळीवरही बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या अध्यक्षपदाच्या बदलासंदर्भात हालचाली सुरू झाल्या होत्या. त्यामुळे ठाकरे गटाच्या नेत्यांनी तातडीने मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन अध्यक्ष बदलू नये, अशी विनंती केली.

Related Articles

Back to top button