सोलापूरसह अन्य भागात लाडकी बहीण योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, या योजनेबद्दल सोशल मीडियावर अनेक अफवा पसरल्या जात आहेत. या योजनेचे फॉर्म पुन्हा तपासले जातील, अनेक महिलांचे अर्ज रद्द होतील, असे काही व्हिडिओ आणि रील्स व्हायरल झाले आहेत. यावर आता माजी मंत्री आणि आमदार अदिती तटकरे यांनी दिले आहे. तटकरेंनी एक पत्रक काढून अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन केले आहे.
लाडकी बहीण योजनेबद्दल रिल्स व व्हिडिओच्या माध्यमातून दिशाभूल करणारी माहिती समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात येत आहे. लाडकी बहीण योजना लागू झाल्यापासून आतापर्यंत योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल झालेला नाही, अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडून प्रसारित करण्यात आली आहे. तसेच एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून याबाबतीत मी स्वतः जातीने लक्ष ठेवून आहे. तरी याबाबत समाज माध्यमांतून होणाऱ्या अपप्रचारास कोणीही बळी पडू नये, अशी विनंती तटकरेंनी केली आहे.
दरम्यान, राज्यातील सुमारे अडीच कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना शासनाकडून दरमहा दीड हजार रुपये दिले जात आहेत. ही रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जात आहे.