महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्याच्या विविध भागांत मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही जिल्ह्यांसाठी ‘यलो’ आणि ‘ऑरेंज’ अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्यात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असला तरी बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाचा जोर वाढला आहे. पुणे जिल्ह्यात परतीच्या पावसाने थैमान घातले असून उपनगर आणि ग्रामीण भागात जोरदार सरी कोसळल्या आहेत. त्यामुळे काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले आहे. मुंबईतही पावसाने काही ठिकाणी जोरदार हजेरी लावली आहे. अनेक सखल भागांत पाणी साचले आहे. मराठवाड्यातही अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील २४ तासांत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरूच राहील. विशेषतः मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण-गोवा परिसरात अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी सतर्क राहावे. महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असा सल्ला देण्यात आला आहे.